भंडारा : कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर नेमकं कारण कळणार | पुढारी

भंडारा : कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर नेमकं कारण कळणार

भंडारा; पुढारी वृत्तसेवा

करोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीर सुस्त झाले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा तालुक्यातील दवडीपार बाजार येथे घडली. अल्ला बकर ईसराईल शेख (वय ४९, रा. दवडीपार बाजार) असे मृतकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्ला शेख यांनी १३ नोव्हेंबर रोजी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर त्यांचे शरीर सुस्त होऊन हातपाय दुखू लागले. प्रकृती खालावल्याने त्यांना गावातील खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू केले होते.

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने २१ नोव्हेंबर रोजी त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र २३ नोव्हेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. फारुखी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी, करोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. रुग्णाचे शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button