,ना,गपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात गंभीररीत्या जळल्याने 6 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर झाल्याची घटना घडली. सुरक्षात्मक उपाय, इतरांच्या सुरक्षितता बाबतीत दिरंगाईच्या, मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कारणावरून आज या प्रकरणी कंपनीचे संचालक जय शिवशंकर खेमका आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. दुसरीकडे मृतकांच्या पार्थिवावर धामना आणि सातनवरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांना कंपनीच्या वतीने 25 तर राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश आज देण्यात आले.
मृतकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल, असे गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. जखमीवर शासकीय खर्चाने उपचार, कंपनीकडून भरीव मदत व या घटनेत कंपनीतील दोषींवर कारवाईसाठी काल रात्रीपर्यंत अमरावती महामार्ग रोखून धरण्यात आला होता. विशेष म्हणजे मृतकांमध्ये नजीकच्या गावातीलच तरुण, तरुणींचा समावेश आहे. हिंगणा पोलीस, अग्निशमन यंत्रनेने परिस्थिती नियंत्रणात आणली. तर हा स्फोट नेमका कशामुळे झाला?, कंपनीत सुरक्षात्मक,अग्निशमन प्रतिबंधक उपाय योजना नव्हती का?, याविषयी तपास यंत्रणा कामाला लागली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जि. प. माजी अध्यक्ष सुनीता गावंडे यांच्या हस्ते आज मृतकांच्या नातेवाईकांना धनादेश देण्यात आले. आज दुपारी घटनास्थळी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार आदींनी भेट दिली.
शासन, व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. व्यवस्थापनाविरोधात संतप्त नागरिकांशी संवाद साधला. फटाक्यांची मोठ्या प्रमाणात बारुद आणि वाती तयार करण्याचे काम सुरू असताना झालेल्या या स्फोटात इमारतीचे छत देखील खाली कोसळले, काही महिला पुरुष मशीनवर काम करीत असताना ही भीषण घटना घडल्याने मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
या स्फोटात प्रांजली मोदरे (वय 22), प्राची फलके (वय 20), वैशाली क्षीरसागर (वय 20), शितल चटप (वय 30), दानसा मरसकोल्हे (वय 26), मोनाली अलोणे (वय 27), श्रद्धा पाटील (वय 22), प्रमोद चवारे (वय 25), पन्नालाल बंदेवार (वय 50) गंभीर जखमी झाले आहेत. यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तीन गंभीर जखमींवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीजवळच असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. यातही इमारत उद्ध्वस्त झाल्याने 9 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने त्या स्फोटाच्या कटू स्मृतींना उजाळा मिळाला.
हेही वाचा