नागपूर, पुढारी वृत्तसेवा: वर्धा येथील भाजप खासदार रामदास तडस यांचा मुलगा व माझे पती पंकज तडस यांनी लग्नानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवले. मला केवळ उपभोगाची वस्तू म्हणूनच वारंवार वापरण्यात आले. दरम्यान माझ्या मुलाचा जन्म झाला. आता या बाळाला ओळख कोण देणार? असा सवाल करत, पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर आरोप केले आहेत. त्या पत्रकार परिषदेत (दि.११) आज बोलत होत्या. (Pooja Tadas News)
माझ्याकडे पैसे मागितले, हनी ट्रॅप असा आरोप केला जातो. मात्र मला पैसे नकोत. खासदार रामदास तडस आणि कुटुंबीय या बाळाशी संबंध नसल्याचे सांगत आहेत. त्याची डीएनए चाचणी करायला सांगतात आहेत, असे आरोप पूजा तडस यांनी आज पत्रकार क्लब येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहेत. (Pooja Tadas News
आपण स्वतःच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची लढाई लढत असून, कुणाची उमेदवारी रद्द करा अशी मागणी करण्यासाठी नाही, असेही पूजाने स्पष्ट केले. पूजा यांच्या मते, खासदार तडस म्हणतात, त्यांनी स्वतः लग्न केले. आमचा काहीही संबंध नसल्याने मी मुलाला बेदखल केले. मुलाला घरातून काढले नाही, असे सांगत मग मला एकटीलाच का घराबाहेर काढले? असा सवालही पूजा यांनी केला. (Pooja Tadas News)
मला राजकारण नको, मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र, ती न्यायालयाच्या माध्यमातून करा. मला दोन वेळचे अन्नही दिले जात नाही. मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची सभा घेण्यासाठी लवकरच वर्ध्यात येणार आहात. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या. तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचेही पूजा तडस यांनी स्पष्ट केले.
तडस कुटुंबियांच्या मते हे प्रकरण न्यायप्रविष्ट यापूर्वीही केले. दुसरीकडे या आरोपांविषयी खासदार रामदास तडस म्हणाले, पूजा तडस आणि पंकज तडस यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. काही दिवस दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण काही समाजकंटकांनी पूजा तडस यांना हाताशी धरुन कटकारस्थान रचले. यासंदर्भातील संपूर्ण कॅसेट पंकज तडस यांनी न्यायालयात सादर केली. अद्याप निकाल नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मी अधिक बोलणार नाही. 2020 मध्ये हाच प्रकार झाला. पण हे प्रकरण विरोधकांचा डाव आहे. विरोधी पक्षाला हाताशी धरुन लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करायची, आता विरोधकांसोबत पत्रकार परिषद घ्यायची, हा कट आहे.
दरम्यान, पंकज तडस म्हणाले, १० लोकांनी मला हनी ट्रॅप करुन फसवल्याचे सर्व पुरावे मी न्यायालयासमोर सादर केले आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. यातीलच काहीजण जामीनावर बाहेर आहे. पूजा तडस जाणीवपूर्वक न्यायालयात हजर राहत नाही. आम्ही यांच्याविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दादही मागितली आहे. याबाबत पूजा तडस यांनी 17 महिन्याचे बाळ असताना विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा प्रकारच एका महिलेवर अन्यायकारक बेकायदेशीर असल्याचा आरोप पती पंकज तडस यांनी केला.