Malkapur Urban Bank: मलकापूर अर्बन बँकेवर आरबीआयचे निर्बंध | पुढारी

Malkapur Urban Bank: मलकापूर अर्बन बँकेवर आरबीआयचे निर्बंध

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : Malkapur Urban Bank : जिल्ह्यातील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बुधवार २४ नोव्हेंबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रात व ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

मलकापूर अर्बन बँकेच्या (Malkapur Urban Bank) विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र भागात एकूण २८ शाखा आहेत आणि एक हजार कोटींहून अधिक ठेवी आहेत. भाजपा नेते माजी आमदार चैनसुख संचेती या बँकेचे अध्यक्ष आहेत. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यातून सहा महिन्यांमध्ये एकूण दहा हजार एवढीच मर्यादीत रक्कम काढता येणार आहे.

आरबीआयच्या पूर्वपरवानगी शिवाय मलकापूर अर्बन बँक (Malkapur Urban Bank) आता कोणत्याही कर्जाचे नुतनीकरण, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही तसेच कोणतेही दायित्व घेऊ शकत नाही. बँक आपले व्यवहार सुरू ठेऊ शकेल. परंतु, आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध लागू असतील, असे आरबीआयच्या आदेशात म्हटले आहे.

Back to top button