गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : पोलिसाचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी काल बुधवारी (दि.१५) रोजी रात्री भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्यांतर्गत पेनगुंडा येथे एका व्यक्तीची हत्या केली. दिनेश गावडे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो लाहेरी येथील रहिवासी होता.
संबंधित बातम्या
पेनगुंडा-नेलगुंडा रस्त्यावर दिनेश गावडेचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यानी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात पोलिसाचा खबऱ्या असल्यामुळे दिनेशची हत्या करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
दिनेश गावडे याने त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर पेनगुंडा येथे कामावर पाठविला होता. त्यावर देखरेख करण्यासाठी तो पेनगुंडा येथे गेला होता. मात्र, मध्यरात्री नक्षलवाद्यानी त्याला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
यासंदर्भात पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी दिनेश गावडेची हत्या नक्षल्यांनी केली असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, तो पोलिसांचा खबऱ्या नव्हता. नक्षलवादी निरपराध नागरिकांना ठार करताहेत, असे नीलोत्पल म्हणाले.