Milind Teltumbde : समाजसेवेसाठी घर सोडले होते तेलतुंबडेने | पुढारी

Milind Teltumbde : समाजसेवेसाठी घर सोडले होते तेलतुंबडेने

गडचिरोली/ यवतमाळ ; पुढारी वृत्तसेवा : काका मिलिंदने 1996 साली मी जनसेवेसाठी निघालो असे सांगत घर सोडले. त्यानंतर तेलतुंबडे कुटुंबीयांशी त्यांचा कधीही संबंध आला नाही. एवढेच नव्हे तर आजोबा आणि वडिलांच्या अंतिम संस्कारालासुध्दा ते आले नाहीत. ते गडचिरोलीतील चकमकीत ठार झाल्याचीच बातमी माध्यमांमुळे आम्हाला समजली. गडचिरोलीच्या जंगलात 10 तास चाललेल्या चकमकीत सर्वांत जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) याचा नातू विप्लवने संवाद साधत ही गोष्ट यवतमाळमध्ये ऐकवली.

कोरची तालुक्यातील जंगलात ठार झालेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

13 नोव्हेंबरला मर्दिनटोला जंगलात झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले. रविवारी त्यातील 16 नक्षल्यांची ओळख पटली. त्यात मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश होता. त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर आणि सर्व शासकीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर दुपारी 2 वाजता तेलतुंबडेे कुटुंबीय मिलिंदचा मृतदेह वणी येथे घेऊन गेले. संध्याकाळी तेथे मिलिंदच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उपस्थित होती. (Milind Teltumbde)

अँजेला सोनटक्के हिलाही महाराष्ट्र व गुजरातच्या भागात नक्षल चळवळीचा गोल्डन कॉरिडॉर तयार करीत असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एटीएसने एप्रिल 2011 मध्ये अटक केली होती. त्यानंतर मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. तिला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये जाता येणार नाही, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली होती. त्यामुळे ती गडचिरोली येथे पतीचा मृतदेह घेण्यासाठी येऊ शकली नाही. मात्र, यवतमाळमध्ये सोनटक्के हिला बंदी नसल्याने तिच्या उपस्थितीत तेलतुंबडेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Milind Teltumbde)

मिलिंद नक्षलवादी झाल्याचे माहिती नव्हते. घर सोडल्यानंतर ते माओवादी चळवळीत असल्याचे प्रसिध्दी माध्यमांमधूनच कुटुंबीयांना कळले. घर सोडल्यानंतर त्याची कधीच भेट झाली नाही. रविवारी थेट त्याचा मृतदेहच पाहण्याची वेळ कुटुंबीयांवर आली, असेही विप्लव यांनी सांगितले.

गडचिरोलीत जवानांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : शिंदे

नागपूर : गडचिरोलीत नक्षल्यांविरोधात ऐतिहासिक कारवाई करणार्‍या जवानांसाठी गडचिरोलीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जखमी जवानांची विचारपूस केल्यानंतर शिंदे म्हणाले, तिन्ही जवानांची प्रकृती ठीक असून, एका जवानावर उद्या शस्त्रक्रिया होईल. नक्षल्यांच्या कोणत्याही धमक्यांना सरकार भीक घालीत नाही, असा संदेश आम्ही या कारवाईतून दिला आहे.

Back to top button