अमरावतीत संचारबंदी! | पुढारी

अमरावतीत संचारबंदी!

अमरावती/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : त्रिपुरातील मुस्लिमविरोधी दंगलीचे पडसाद उमटल्याने शुक्रवारी अशांत झालेली मालेगाव, औरंगाबाद, भिवंडी ही शहरे निवळली असतानाच अमरावतीत मात्र शनिवारी भाजपने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले आणि अश्रुधूर, लाठीमार आणि सामाजिक तणावाच्या परिस्थितीत संपूर्ण अमरावतीत संचारबंदी लागू करावी लागली.

विविध मुस्लिम संघटनांनी अमरावतीत शुक्रवारी काढलेल्या मोर्चादरम्यान समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने हिंदुत्ववादी संघटनांसह शनिवारी अमरावती बंदची हाक दिली. या बंददरम्यान शहरात अनेक ठिकाणी दगडफेक झाली. काही पोलीस व नागरिकही त्यात जखमी झाले. पोलिसांनीही बळाचा वापर केला. जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचा मारा केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारनंतर दोन्ही समुदायांतील लोक परस्परांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर सायंकाळनंतर शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली.

शुक्रवारी मोर्चावेळी मालवीय ते चित्रा चौकादरम्यान व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड झाली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी अमरावती बंदचे आवाहन केले होते.

नेत्यांच्या साक्षीने जाळपोळ

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सकाळपासूनच मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजकमल चौकात एकत्रित येण्यास सुरुवात झाली. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, प्रवीण पोटे, तुषार भारतीय, जयंत डेहणकर, शिवराय कुळकर्णी, निवेदिता चौधरी उपस्थित होते. हे सर्व नेते हजर असलेल्या राजकमल चौकातच नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावाने जाळपोळ केली.

जमावाने राजकमल चौकातील इलेक्ट्रिकल्स, मिक्सर दुरुस्ती दुकान, पानपट्ट्या तसेच अंबापेठ येथील एक गॅरेज जाळले. नेहरू मैदानाला लागून असलेल्या काही दुकानांनाही आग लावली. नमुना गल्ली परिसरात एक कार पेटवून दिली. अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. राजकमल चौकाला लागून असलेल्या नमुना परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेने अफवांना ऊत आला.

विशिष्ट समुदायाच्या नागरिकांची घरे असलेल्या परिसरात जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले. तत्पूर्वी दोन्ही बाजूंचे दंगलखोर नमुना गल्लीत समोरासमोर आले होते. नमुना गल्लीतूनही तलवारी, चायना चाकूसह अनेक लोक घराबाहेर पडले व दगडफेक सुरू केली. नंतर काही वेळातच दुसर्‍या समुदायाचा एक गट रस्त्यावर आला. सक्करसाथ, सराफ बाजार, शनी मंदिर परिसर, मसानगंज, कठोरा नाका, चांदणी चौकातील परिस्थिती आणखी चिघळली. सकाळी 9 वाजता सुरू झालेला हिंसाचार दिवसभर सुरू होता.

हवेत तलवारी फिरवल्या

सायंकाळी चांदणी चौकात विशिष्ट समुदाय व पोलीस समोरासमोेर आले. पोलिसांसमोर यावेळी हवेत तलवारी फिरवण्यात आल्या. प्रथम हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. हिंदू संघटना दुपारनंतर शांत झाल्या. नंतर विशिष्ट समुदायाच्या परिसरातून रोष उफाळून आला होता. चांदनी चौक ते इतवारा बाजारपर्यंतच्या परिसरांना पोलिसांच्या मोठ्या संख्येमुळे छावणीचे स्वरूप आले होते.

जवान जखमी

दंगलखोरांना नियंत्रणात आणताना पटवा चौकात राज्य राखीव दलाचे सचिन लकडे, वर्धा पोलीस दलातील शालिकराम वाघमारे तसेच संजय पवार, सौरभ साहू, सुमित साहू, अभिजित भारुळकर जखमी झाले. सक्करसाथ परिसरात पोलीस कर्मचारी जमिल अहमद जखमी झाले. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्यासह आयुक्तालयांतर्गत सर्वच ठाण्यातील निरीक्षक, पोलीस तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीने मिळून परिस्थिती नियंत्रणात आणली. अमरावती परिक्षेत्रातील वाशिम, अकोला, वर्धा येथील पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी बोलावण्यात आला होता. शिवाय एसआरपीएफच्या चार ते पाच तुकड्या तैनात होत्या.

प्रभाकरराव वैद्य यांचे शांततेचे आवाहन

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी शांततेचे आवाहन केले. हिंदुस्थानातील 25 राज्यांतील विविध जाती-धर्मांतील मुले या मंडळात एकोप्याने राहतात, हे विशेष!

खासदार राणा यांची पालकमंत्र्यांवर आगपाखड

त्रिपुरात काय असे घडले, की ज्याचे भांडवल हजारो कि.मी. दूर असलेल्या अमरावती शहरातील वातावरण बिघडवण्यासाठी केले गेले. मी या हिंसाचाराचा निषेध करते, असे खासदार नवनीत राणा यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितले. पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली.

Back to top button