नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २६) केलेला रोड शो शास्त्रज्ञांना घेऊन केला असता तर त्यावर अधिक आनंद झाला असता असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. आरएसएस मध्ये स्त्रियांचा सन्मान केला गेला नाही, भाजपला ना स्वातंत्र्यासाठी लढाईचा इतिहास, ना देश उभारणीचा इतिहास आहे, आता देशाची ते विभागणी करू इच्छित आहेत.
शरद पवार हे पुरोगामी विचाराला धरून राहतील, त्यांच्या भूमिकेमागे काही तरी नक्कीच हेतू आहे, ते देश पातळीवर इंडियासोबत तर राज्यात मविआसोबत आहेत, तुम्हाला विसंगती दिसत असली तरी आम्हाला दिसत नाही, पवार जेष्ठ नेते आहेत, ते भूमिका मांडतात, त्यावेळी निश्चितचपणे इंडियाला फायदा होईल असा विश्वास आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना सीबीआयचे हे अपयश आहे, आरोपींना पाठीशी घालणारा आणि वाचवणार प्रकार आहे. वाटेल त्या पद्धतीने इशाऱ्यावर चालणारी संस्था सीबीआय आहे.
नागपूरची जागा तुम्ही लढविणार का, असे छेडले असता कुठं कोण लढणार? हे मी ठरवणार नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधीच ठरवतील. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. पीके धोक्यात आली, दुष्काळ घोषीत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, मालाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या करत आहेत. पीक विमा प्रश्न त्वरित द्या अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.