नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी (दि.०४ जून) फूट पडल्यानंतर आता राज्यभरात पक्ष संघटनेत बंडाळी अटळ असल्याचे दिसत आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी संभ्रमावस्था कायम आहे. नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज उर्फ बाबा गुजर यांना तातडीने पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा अध्यक्षपदावरून हटवित असल्याचे पत्र पाठवले आहे. दुसरीकडे पक्षाने राजू राऊत यांच्याकडे जिल्हाअध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी सोपविली आहे.
राऊत यांच्या नियुक्तीचे पत्र देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहे. उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी जिल्हाप्रमुख या नात्याने बाबा गुजर यांनी राहण्याचा, पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय पक्षविरोधी असल्याचे सांगत प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. गुजर हे देशमुख समर्थक तर राऊत हे माजी मंत्री रमेश बंग समर्थक मानले जातात. उद्या पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीनंतर आणखी कुणावर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार हे स्पष्ट होणार आहे.