नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला सुरुवात झाली. बुलडाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होत आहेत. पहिल्या दिवशी भंडारा जिल्हयातील ७८० उमेदवारांची चाचणी झाली. देशातील दुसऱ्या वर्षातील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. यावर्षी ६ हजार ३५३ उमेदवारांची चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. (Army Agniveer Bharti Rally 2023)
सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॅारिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात मध्यरात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली. शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पर्धेनंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया आज सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती. (Army Agniveer Bharti Rally 2023)
देशात (Army Agniveer Bharti Vidarbha) या भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध होत असलेल्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधांमध्ये नागपूरच्या सुविधा अधिक उत्तम असल्याने देशातील दुसऱ्या वर्षीच्या अग्निवीरची पहिली भरती नागपूरपासून सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने क्रीडा विभागामार्फत विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅक व सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिकेने वाहतुकीसाठी वातानुकूलित बसेस, वैद्यकीय सहाय्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी व अन्य व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर बाहेर गावांवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खानपानाची व्यवस्था केली आहे. अनेक संस्था यासाठी संपर्कात असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने मैदानाबाहेर तात्पुरता निवारा उभारला आहे.
अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च २०२३ (Army Agniveer Bharti Rally) मध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल २० मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ६० हजारांच्या तुलनेत सहा हजार उमेदवार यावेळी निवडीसाठी आले आहेत. मुलांनी यावर्षी शारीरिक चाचण्यांची उत्तम तयारी केल्याचे प्रतिबिंब यावर्षीच्या निवड प्रक्रियेत दिसून येत आहे.
हेही वाचा