नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांची आज राज्यालाच नव्हे तर देशाला गरज असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याविषयीचा अंतिम निर्णय उद्या सकाळी ११ वाजता बैठकीत होईल तूर्तास कोणीही पक्षात नाराज नाही. कुणाचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत नाही, अशी माहिती माजी मंत्री व या समितीचे सदस्य असलेले आमदार अनिल देशमुख यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्टपणे इन्कार केला.
उद्याच्या बैठकीत ते हजर राहणार असल्याचे सांगितले. नागपूर जिल्ह्यातील काटोल या आपल्या मतदारसंघात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता ते बोलत होते. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी एकाएकी हा निर्णय जाहीर केला. शरद पवारांची महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आज गरज आहे. देशातील विविध पक्षांना ते एकत्रित करू शकतात. यामुळेच उद्याच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, असा समितीचा प्रयत्न आहे. एकंदरीत सुप्रिया सुळे अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल की जयंत पाटील यांच्यापैकी कुणी अध्यक्ष होणार की स्वतः शरद पवारच तूर्त अध्यक्षपदाची धुरा यापुढेही सांभाळणार याविषयीचा निर्णय उद्याच होणार आहे. स्वतः शरद पवार यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना याविषयीचे संकेतही दिले आहेत.