नागपूर : भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून घरमालकाची आत्महत्या | पुढारी

नागपूर : भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून घरमालकाची आत्महत्या

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून एका घरमालकाने आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापुर्वी या घरमालकाने व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमावर प्रसारीत केला. यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. मुकेशकुमार श्रीचंद रिझवानी (वय ४६, रा. कस्तुरबानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

भाडेकरू घरभाडे देण्यास टाळाटाळ करीत आहे. घर रिकामे करण्यासाठी त्याने दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली असून, ठार मारण्याची धमकी देत आहे. अशा आशयाची चिठ्ठी लिहून घरमालकाने आत्महत्या केली. घरमालकाने भाडेकरूकडून होत असलेल्या छळाच्या माहितीचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी भाडेकरू दोन भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश नामोमल सेतिया (४५) व त्याचा मोठा भाऊ (नाव समजलेले नाही) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशकुमार यांचे सौंदर्यप्रसाधनाचे दुकान आहे. राजेश याने मुकेशकुमार यांच्या मालकीच्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. राजेश हा मुकेश यांना घरभाडे देण्यास टाळाटाळ करायला लागला. तो त्यांना शिवीगाळही करायचा. डिसेंबर महिन्यात वीज मीटर जळाले. त्यांनी राजेश याच्या भावाकडे तक्रार करून घर रिकामे करण्यास सांगितले. राजेश व त्याच्या भावाने घर रिकामे करण्यासाठी मुकेशकुमार यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.

मुकेश यांनी राजेशला ६० हजार रुपये दिले. आणखी साडेचार लाख रुपये दिल्याशिवाय घर रिकामे करणार नाही, असे राजेश हा मुकेश यांना म्हणाला. राजेशने त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. राजेश व त्याच्या भावाचा छळ असह्य झाला. ६ ऑक्टोबरला मुकेशकुमार यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली.

राजेश व त्याचा भाऊ मानसिक व शारीरिक छळ करीत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चित्रीकरण त्यांनी मोबाइलमध्ये केले. त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांना मुकेशकुमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी व मोबाइलमधील चित्रीकरण आढळले. त्यानंतर पोलिसांनी राजेश व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Back to top button