यवतमाळ : कुर्‍हाडीचे घाव घालून पत्नीचा खून - पुढारी

यवतमाळ : कुर्‍हाडीचे घाव घालून पत्नीचा खून

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालून पत्नीचा खून केला. घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे रविवारी (दि. १०) ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पतीनेच घाटंजी पोलिस ठाणे गाठून खुनाची माहिती देत गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संतोष गुरुदेव ठाकरे याचा पत्नी दीक्षा (वय ३०) हिच्याशी शनिवारी रात्री घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघेही झोपी गेले. मात्र, रात्रीच्या भांडणाचा वाद संतोषच्या डोक्यात होता. रविवारी सकाळी संतोषने पुन्हा पत्नी दिक्षा सोबत वाद घातला. रागाच्या भरात संतोषने पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घातले. मानेवर व डोक्यावर सात घाव घालून तिला जागीच ठार केले. यानंतर तो स्वतः गुन्ह्याची माहिती देण्यासाठी घाटंजी पोलिस ठाण्यात पोहोचला.

झालेल्या थरारक घटनेनंतर पोलिसांनी थेट पंगडी हे गाव गाठले. पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास घाटंजी पोलिस निरीक्षक मनीष दिवटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर भुजाडे व बिट जमादार प्रदीप मेसरे करीत आहे. आरोपी संतोषला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे दाम्पत्याला सात वर्षाची एक मुलगी व पाच वर्षाचा मुलगा आहे. आईचा मृत्यू झाल्याने आणि वडील कारागृहात गेल्याने हे दोन्ही चिमुकले उघड्यावर पडले आहेत.

Back to top button