नागपूर, पुढारी वृत्तसेवा : २०२४ साली राम मंदिर देशवासीयांसाठी खुले होत असताना याच मुद्द्यावर, धार्मिकतेच्या आधारावर निवडणुका लढल्या जाऊ शकतात. मात्र, आम्ही विरोधक म्हणून लोकांपुढे जाताना राष्ट्रीय, स्थानिक प्रश्नांना महत्त्व देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्याचवेळी विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रित होतील असे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय आता जुना झाला आहे. ३० वर्षांपूर्वी आपण संसदेत बोललो. त्यांचे सामाजिक, वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे गरजेचे आहे. या शब्दात त्यांनी सावरकर यांचे समर्थन केले. विशेष म्हणजे याच प्रश्नी मविआचे गैरसमज दूर करण्याचे कामही पवार यांनीच केले. त्याकाळी मंदिरामध्ये वाल्मिकी समाजाचा पुजारी ठेवणे, गाय संदर्भातील त्यांचे सडेतोड भूमिकेचा संदर्भही पवार यांनी यावेळी दिला. अनेक बाबतीत ते आक्षेपार्ह बोलले असले तरी आज ते हयात नसल्याने त्या विषयावर बोलणे उचित नाही. देशापुढे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी, ते दुर्लक्षित करण्यासाठी असे विषय वारंवार काढले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. याविषयीची कटूता अधिक वाढू नये हा प्रयत्न प्रत्येकाने करावा यावर भर दिला. अदानी प्रश्नी काँग्रेसने आंदोलनात्मक भूमिका घेतली असताना तुम्ही प्रशंसा केली असे विचारले असता उद्योजक म्हणून मी किर्लोस्कर, बजाज ,अदानी अशा अनेकांवर लेखन केले असे स्पष्ट करत देशात गुंतवणूक वाढावी,रोजगार निर्माण व्हावेत यासाठी आवश्यक धोरणे हवीत अशी अपेक्षा करत इतरांच्या मतांवर मी मत व्यक्त करणार नाही असेही पवार यांनी सांगितले.