चंद्रपूर : रूग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगणे बंद करा : आ. किशोर जोरगेवार | पुढारी

चंद्रपूर : रूग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगणे बंद करा : आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही रूग्णांना बाहेरुन औषध विकत आणायला सांगणे चुकीचं आहे. हे प्रकार तात्काळ थांबवा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला दिले. सोमवारी (दि.६) जोरगेवार यांनी शासकीय रूग्णालयाची पाहणी केली.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाबद्दल रूग्णांच्या अनेक तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे आल्या होत्या. जोरगेवार यांनी शासकीय रूग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. रुग्णांवर योग्य उपचार झाले पाहिजेत. जिल्ह्यासह बाहेर जिल्हातील रुग्ण उपचाराकरिता येतात. रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणूक द्या. अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या. ते म्हणाले, रुग्णालयातील अनेक वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ती तात्काळ दूर करा. शंभर पिण्याच्या पाण्याचे कॅन उपलब्ध करुन दिले आहेत. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सुचवा. रक्त नमुना चाचणी लॅबच्याही अनेक तक्रारी आहेत. रुग्णांच्या रक्ताचा नमुना प्राप्त झाल्या नंतर त्याचा अहवाल कमीत कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करा. आयसीयुच्या बेडवर ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करा, अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणी दरम्यान प्रसूति कक्षात रुग्णांना बाहेरुन औषध लिहून देत असल्याची तक्रार रुग्णांनी केली. यावर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरुन औधष आणायला का सांगता? असा सवाल करत यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा सुचना दिल्या.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, उपनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, डॉ. तेजस्विनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. प्रशांत मगदुम, डॉ. ऋतुजा गनगारडे यांच्यासह वंदना हातगावर, भाग्यश्री हांडे, जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विश्वजीत शाहा, देवा कुंटा, बबलू मेश्राम, रुपा परसराम, दुर्गा वैरागडे आदी उपस्थिती होते.

Back to top button