ही तर प्रकाश आंबेडकरांची मानसिक दिवाळखोरी : बावनकुळे | पुढारी

ही तर प्रकाश आंबेडकरांची मानसिक दिवाळखोरी : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीत जागा मिळविण्यासाठी धडपडत असलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची बेताल वक्तव्ये मानसिक दिवाळखोरी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आगामी काळात केंद्रात बिगर भाजप सरकार आल्यास मोदी आणि शहा यांना तुरुंगात टाकण्याची भाषा प्रकाश आंबेडकरांनी वापरली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला त्याचा उद्रेक होईल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. पुण्यातील एका जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशी वक्तव्ये केली जात असतील तर आम्हाला राज्यभर निषेध करावा लागेल, ही त्यांची मानसिक दिवाळखोरी आहे. असे बावनकुळे नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले.

देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले होते. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, असेही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीत जाण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती झाली असली तरी अद्याप काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांना थारा दिलेला नाही. यावर बावनकुळे यांनी भर दिला.

सत्यजित तांबे पक्षात आल्यास स्वागतच

विधानपरिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर नाशिक मतदार संघात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. सत्यजित तांबे भाजपमध्ये येणार असल्यास त्यांचे निश्चितच स्वागत करू या शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी हे स्पष्ट केले. तूर्तास त्यांनी असा विचार कुणाकडे बोलून दाखवला नाही. कुठल्या पक्षात जायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आमच्या पक्षात ते येत असल्यास आम्ही स्वागतच करू, अनेकांना या पक्षात सन्मानाने स्थान देण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला.

हेही वाचा : 

Back to top button