पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; अमरावती विभागात २ लाख पदवीधर मतदारांची नोंदणी | पुढारी

पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; अमरावती विभागात २ लाख पदवीधर मतदारांची नोंदणी

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे मतदान सोमवारी (दि.30) सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार आहे. निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून नेमानी गोडाऊन, बडनेरा रोड येथे करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान अधिकारी व संबंधितांचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहेत.

अमरावती जिल्हा तालुकानिहाय मतदार संख्या

अमरावती जिल्ह्यात 37 हजार 959 पुरूष, 26 हजार 376 महिला, इतर 9 असे एकूण 64 हजार 344 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अमरावती तालुक्यात 32 हजार 161, भातकुली तालुक्यात 1135, तिवसा तालुक्यात 1567, चांदूर रेल्वे तालुक्यात 1671, धामणगाव रेल्वेमध्ये 1 हजार 728, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 1 हजार 297 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे, मोर्शी तालुक्यात 2 हजार 364, वरूड तालुक्यात 4 हजार 358, अचलपूर तालुक्यात 5 हजार 599. चांदूर बाजार तालुक्यात 3 हजार 233, दर्यापूर तालुक्यात 4 हजार 067, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 3 हजार 693, धारणी तालुक्यात 1091, चिखलदरा तालुक्यात 380 मतदारांची नोंदणी आहे. जिल्ह्यात एकूण 75 मतदान केंद्रे आहेत.

अमरावती विभागातील मतदारांची संख्या

अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात 1 लाख 34 हजार 14 पुरूष, 72 हजार 141 महिला व इतर 17 असे एकुण 2 लाख 06 हजार 172 मतदारांची नोंदणी झालेली आहे.

अकोला जिल्ह्यात 31 हजार 769 पुरूष, 18 हजार 831 महिला व 06 इतर असे एकूण 50 हजार 606, तसेच बुलडाणा जिल्ह्यात 27 हजार 168 पुरूष, 10 हजार 726 महिला (इतर शून्य) असे एकूण 37 हजार 894 मतदार नोंदणी आहे. वाशिम जिल्ह्यात 13 हजार 333 पुरूष, 4 हजार 715 महिला व 02 इतर असे एकूण 18 हजार 50 आणि यवतमाळ जिल्ह्यात 23 हजार 785 पुरूष, 11 हजार 493 महिला (इतर शून्य) एकूण 35 हजार 278 मतदारांची नोंदणी आहे.

मतदान केंद्रे

विभागात 262 मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलडाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288, मतदान अधिकारी म्हणून 1 हजार 153 व सूक्ष्म निरीक्षक म्हणून 289 अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

पदवीधर निवडणुकीचे काम सुरळीत पार पडण्यासाठी विविध कक्ष व नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी ceoelection.maharashtra.gov.in./gtsearch/ ही लिंक विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button