यवतमाळ : इंझाळा गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटला, शिक्षकाने विहीर गावाला केली दान | पुढारी

यवतमाळ : इंझाळा गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटला, शिक्षकाने विहीर गावाला केली दान

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील इंझाळा येथील एका शिक्षकाने गावातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी स्वत:ची विहीर दान केली. गावकऱ्यांची दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट पाहून या शिक्षकाने तीन लाख रुपये खर्चुन नुकतीच खोदलेली विहीर व सभोवतालची सुमारे अडीच हजार स्केअर फूट जागा गावाला दान दिली. यामुळे इंझाळा गावाचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे.

सुरेश तुकाराम कस्तुरे, असे या शिक्षकाचे नाव आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कुटुंबात सात एकर शेतजमीन आहे. वडिलांच्या नावे तीन, तर त्यांच्या नावे चार एकर शेती आहे. सुरेश यांनी ९ महिन्यांपूर्वी शेतात ३० फूट विहीर खोदली. विहिरीला भरपूर पाणी लागले. बांधकामासह तीन लाख रुपये विहीर खुदाईकरीता केला.

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागते. सध्या गावात जलजीवन मिशनअंतर्गत दोन विहिरींचे खोदकाम करण्यात आले. पण विहिरींना पाणीच लागले नसल्याने समस्या जैसे थे होती. त्यामुळे सुरेश यांनी आपली विहीर गावाला दान देण्याचा विचार केला. त्यांचे वडील तुकाराम कस्तुरे यांनीही त्यांना प्रोत्साहित केले. गावातील भूदान चळवळीचे प्रवर्तक माजी खासदार दिवंगत सदाशिवराव ठाकरे यांची प्रेरणा घेऊन कस्तुरे यांनी ग्रामपंचायतीला आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. सुरेश यांनी जागा व विहीर ग्रामपंचायतीकडे दान देत असल्याची कागदपत्रे सरपंच वैजयंती ठाकरे, ग्रामसेवक अमोल जनगमवार व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत सुपूर्द केलीत.

हेही वाचा :

Back to top button