भंडारा : आंतरराज्यीय सराईत चोरटा जेरबंद :१३ घरफोडीची कबुली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

भंडारा : आंतरराज्यीय सराईत चोरटा जेरबंद :१३ घरफोडीची कबुली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, छत्तीसगड राज्यातील डोंगरगड, राजनांदगाव याठिकाणी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत चोरट्याला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या चोरट्यावर यापूर्वीचे घरफोडी प्रकरणाचे ५० च्यावर गुन्हे दाखल आहेत. प्रवीण अशोक डेकाटे ( वय २७, रा. तिलक वॉर्ड मोहाडी, हल्ली मुक्काम बेसा नागपूर) असे या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले की, २७ नोव्हेंबर २०२२ रोजी पालांदूर येथे घरफोडी करुन सोनेचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पालांदूर पोलिसांचे पथक नेमण्यात आले होते. या गुन्ह्याची कार्यपद्धती पाहिल्यानंतर संशयाची सुई सराईत गुन्हेगार प्रवीण डेकाटे याच्यावर फिरत होती. प्रवीण डेकाटे याने यापूर्वीच भंडारा जिल्ह्यातील ५० हून अधिक गुन्ह्याची कबुली दिली होती. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये पालांदूरातच त्याने याच पद्धतीने घरफोडी केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामीनावर होता. त्यामुळे त्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार रमेश बेदरकर यांना प्रवीण डेकाटे हा कारधा येथील राजस्थानी ढाब्याजवळ असल्याची गुप्त माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार रमेश बेदरकर हे कारधा येथे गेले असता त्यांना तिथे प्रवीण सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याची विचारपूस केली असता त्याने पालांदूर येथे घरफोडीची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्याने भंडारा जिल्ह्यातील भंडारा, वरठी, कारधा, पवनी, गोबरवाही, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागपूर जिल्ह्यातील उमरेड, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव आणि डोंगरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १३ घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ७३ ग्रॅम सोने, दोन दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण ४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, पालांदूरचे ठाणेदार विरसेन चहांदे, पोलिस उपनिरीक्षक प्रीती कुळमेथे, पोलिस हवालदार सतीश देशमुख, रमेश बेदरकर, शैलेश बेदुरकर, ईश्वरदत्ता मडावी, पंकज भित्रे, अन्ना तिवाडे, सुनील ठवकर, योगेश पेठे, कौशीक गजभिये, सुमेध रामटेके, नावेद पठाण यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button