अमरावती : स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की विमा कंपनीच्या? | पुढारी

अमरावती : स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की विमा कंपनीच्या?

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले. परंतु हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्यातील अखेरच्या टोकाला बसवले आहे. त्यामुळे हिवरखेड मंडळातील फळ पीक विमा काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.

हिवरखेड महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ चा संत्रा मृग बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. महसूल विभाग व कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र महसूल मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्याच्या सीमेवरील उमरखेड येथे बसवले. हिवरखेड मंडळामध्ये ५ जून ते १५ जुलै २०२१ दरम्यान दापोरी येथे ८५.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली.

उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर १९५ मिली मीटर पावसाची नोंद झाल्यामुळे हिवरखेड महसूल मंडळामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही मृग बहार फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ हिवरखेड मंडळातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला असून स्वयंचलित हवामान केंद्र विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

हिवरखेड मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून या सर्व विमा धारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ मदत जमा करावी. हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र दापोरी येथे करावे. अशी मागणी वाळके यांनी केली आहे.

शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण मिळावे यासाठी मोर्शी तालुक्यातील महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आले़. शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता यावे व हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी बसविण्यात आलेले स्वयंचलित हवामान केंद्र शेतक-यांसाठी आधार देणारे ठरत नाही. अवेळी पडणारा पाऊस, गारपीट तसेच वादळी वा-यामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास निसर्ग हिरावून घेतो़, अशावेळी चुकीच्या ठिकाणी बसवलेल्या हवामान केंद्राचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
– रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य

हेही वाचा :

Back to top button