नागपूर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे आज सीमावाद प्रश्नी सरकारने प्रस्ताव आणावा यासोबतच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणी करण्यात आली होती. तसेच विधानसभेचे आजचे कामकाज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीतमूळे दिवसभरासाठी स्थगित केले होते.
यानंतरच्या काळात आकस्मिकपणे विधानभवन प्रवेश द्वारासमोर खळबळ माजली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत पत्रके फेकणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. निखिल कुमार गणेर (रा. सावनेर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने विधानभवनच्या प्रवेशद्वारासमोर पत्रके फेकली व गुवाहाटी प्रकरणातील आमदारांनी प्रत्येकी 25 कोटी घेतल्याचा आरोप लावत निषेध करत चौकशीची मागणी केली.
या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला सीताबर्डी पोलीस स्टेशनला रवाना केले. या तरुणांची मानसिक अवस्था ठीक नाही असे पोलिसांनी सांगितले. तर मधूनच तो बावनकुळे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा असेही ओरडत होता. मरणार पण झुकणार नाही, माझा हक्क मी सोडणार नाही अशा निर्धारासह या तरुणाने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र कुणीही दखल न घेतल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे या तरुणाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
कॅशलेस भारत योजना लागु करा, विविध योजनेतील भ्रष्टाचार संपवा आदी विविध मागण्यांसोबतच हिवाळी अधिवेशन नाममात्र न घेता सहा महिने मिनी मंत्रालय नागपुरात हवे या मागणीचा समावेश असलेली पत्रके ताब्यात घेण्यात आली असून यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.
.हेही वाचा