चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय मुलगा ठार | पुढारी

चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय मुलगा ठार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : आई-वडिलांसोबत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका ९ वर्षीय मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जांभोळा शेतशिवारात घडली. नितीन आत्राम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो जांभोळा येथील रहीवासी असून इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.

याबाबतची अधिकची माहिती अशी की, रविवारी आई-वडिलांसह नितीन आत्राम हा ९ वर्षाचा मुलगा गेला होता. सायंकाळपर्यंत आईवडिल शेतात काम करीत होते. दरम्यान, मुलाला भूक लागल्याने तो आईवडिलांनी त्याच्यासाठी आणलेला डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला होता. आईवडिल एकीकडे काम करीत होते. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याचेवर हल्ला चढविला. घटनास्थळापासून त्या चिमुकल्याला बिबट्याने अर्धा किलोमीटर फरफटत नेले. लगतच जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे यांला सदर घटना लक्षात आली. त्यांनी मुलाला वाचविण्याकरीता प्रचंड आरडाओरड केली. आई-वडिलांच्या ही घटनालक्षात आल्याने त्यांनी मुलाला वाचविण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता.

सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ दाखल झाले आहेत. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेने जांभोळा गावात शोककळा पसरली आहे. तो चौथ्या वर्गात शिकत होता. जांभेाळा शेतशिवाराला लागून जंगल भाग असल्यामुळे बिबट व वाघांचे या ठिकाणी वावर आहे.या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना लक्षात घेता वन विभागाने परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. आठवडाभरापासून कोरपणा तालुक्यातील ठिकठिकाणच्या शेत शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहेत. या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button