विधान परिषदेतून : चूक पडळकरांची, दिलगिरी फडणवीसांची | पुढारी

विधान परिषदेतून : चूक पडळकरांची, दिलगिरी फडणवीसांची

  • चंदन शिरवाळे

काहींना आपले शत्रू पाण्यातही दिसतात. तशीच सेम टू सेम अवस्था भाजपा सदस्य गोपीचंद पडळकर यांची झाली आहे. सभागृहात विरोधी बाकावर बसलेले सदस्य आपले शत्रू आहेत, असे त्यांना वाटते. विरोधी बाकावर असताना तत्कालीन मंत्री जयंत पाटीलसुद्धा त्यांना शत्रूसम वाटले होते. राजकीय विरोधकांना अपमानित केले, तरच आपल्याला भाजपाकडून शाबासकी मिळेल, या समजुतीने ते विरोधी सदस्यांच्याबाबतीत सभागृहात बोलताना मुद्दामहून तोल सोडतात.

सांगली हा त्यांचा जिल्हा. अर्थातच जयंतपाटील यांना ते नंबर एकचे राजकीय विरोधक समजतात. पाटील यांच्या विरोधात बोलताना ते कोणत्या भाषेत बोलतात, हे राज्याने ऐकले आहे. त्यामुळे एका वजनदार नेत्याविरोधात खालच्या भाषेत बोललो तरी आपले काहीचबिघडत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. अलीकडे सभागृहालाच सांगली समजून ते वर्तन करतात. पण गुरुवारी त्यांचे वर्तन चांगलेच अंगलट आले. विरोधकांकडे हातवारे करून बोलणाऱ्या पडळकरांना कामकाज संपेपर्यंत हाताची घडी बांधून बसावे लागले.

विदर्भातील संत्रा – मोसंबी पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना सरकारने भरपाई द्यावी, या विषयावर राष्ट्रवादीचे सदस्य अमोल मिटकरी बोलत होते. रस काढावा तसे एकामागोमाग एक प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. पण मंत्री उदय सामंत यांच्याकडून समाधानकारक उत्तर येतनसल्याची त्यांची भावना झाली होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ते जाणल्यामुळे ते बोलायला उभे राहिले. वास्तविक, विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिल्यावर मुख्यमंत्रीही आसनस्थ होतात. हा सभागृहाची शिस्त आणि विरोधी पक्षनेत्याचा सन्मान राखल्याचा भाग असतो. असे असताना पडळकरांनी दानवे यांच्याकडे हाताने इशारे करतये खाली बस खाली बस, अशी एकेरी भाषा वापरली.

खरे तर सभागृहात बोलण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार असतो. त्यासाठी सभापती / उपसभापतींची आधी परवानगी घ्यावी लागते. पण पडळकरांनी नियम जुमानला नाही. विरोधकांना अपमानित करणारी असंसदीय भाषा आणि नियम मोडण्याचे धाडस अंगवळणी पडलेल्या पडळकरांनी खाली बसून दानवे यांना अपमानित करणारे शब्द वापरले. हा एकट्या दानवे यांचा अपमान नाहीतर हम करे सो… चा प्रकार आहे.

विधान परिषदेत यापूर्वी अशा प्रकारची घटना २०१६ च्या हिवाळी अधिवेशनातच घडली होती. राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले सन्मान राखल्याचा भाग असतो. असे असताना सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी सभागृहात दंड आणि मांड्याथोपटत एकमेकांबद्दल एकेरी भाषेचा वापर केला होता . राष्ट्रवादीचे तत्कालीन सदस्य सुनील तटकरे यांनी याबाबत सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या दालनात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कामकाज सुरू झाले होते. त्यानुसार गुरुवारी विधान परिषदेतील शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात जाऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. सभागृह सुरू झाल्यावर एका सदस्याकडून वारंवार असे होणे योग्य नाही, अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या भाषेचा वापर होणार नाही, याबाबत पडळकरांना समज देऊ, असे सांगितल्यानंतर पुढील कामकाज सुरू झाले. मात्र, चूक पडळकरांची असताना फडणवीस यांना दिलगिरी मागावी लागल्याबद्दल भाजपा सदस्यांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली.

Back to top button