नागपूर : पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पहिल्याच टप्प्यात मोठे यश मिळविले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे पूर्ण निकाल येतील. तेंव्हा आमचा पक्ष दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष नक्कीच राहिल, असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केला आहे. एकेकाळी शिवसेना मोठा पक्ष होता. आता तो लहान झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या विचारावर चालायचे ठरवले. त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली, असा टोलाही त्यांनी लगावला.
ग्रामपंचायत निवडणूक निकालावर बोलताना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले की, साडेपाच महिन्यात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली केलेले काम हे जनतेने देखील स्वीकारल्याचे निकालावरून दिसते. उद्धव ठाकरेंची शिवसेना आपला आकडा मोठा दिसण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी आहोत, असे सांगत असले तरी ते तिन्ही स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या पोटात शिरून आम्ही मोठे आहोत, हे त्यांना दाखवावे लागत आहे. त्यामुळे ठाकरेंनी विचार करायला हवा की, एकत्र असताना आपली ताकद काय होती. बाळासाहेब असताना राष्ट्रीय स्तरावरचे नेते त्यांना भेटायला मातोश्रीवर यायचे. उद्धव हे ठाकरे घराण्याचे वंशज आहेत. मात्र, आता ते काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात बैठकीला येत आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधी पक्ष नेत्याच्या घरी बैठकीला जात आहेत. ही वेळ ठाकरेंवर का आली त्याचा विचार त्यांनी करावा, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
उद्धव ठाकरे आज अधिवेशनात आले असले तरी मुख्यमंत्री असताना ठाकरे किती उपस्थित राहिले, हे बघावे लागेल. ते मुख्यमंत्री असतानाही सर्व कामकाज उपमुख्यमंत्री अजित पवारच चालवायचे. आता ते सभागृहात येणार असतील. तर काय भाष्य करतात बघू. त्यांची भाषणे नेहमी राजकीयच असतात. शिवाय, पूर्ण दोन आठवडे ठाकरे विधीमंडळात असतील का, असा प्रश्नही त्यांनी केला. विधीमंडळ पक्ष कार्यालय हे कुणाला द्यायचे हा सर्वस्वी निर्णय सचिवांचा असतो. आमच्याकडे सर्वाधिक पक्षाचे आमदार आहेत. बहुमत जिथे आहेत त्यांनाच कार्यालय दिले जाणार हे सर्वश्रुत आहे, असेही शंभूराज देसाई यांनी कार्यालय वादावर सांगितले.
हेही वाचलंत का ?