नागपूर : भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा | पुढारी

नागपूर : भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा राज्यातील ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात हाती आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून, १४० ग्रामपंचायती शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राखल्या आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

कधीकाळी मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे. सर्व निकाल येतील तेव्हा किमान ३ हजार ग्रामपंचायती भाजपाच्या तर १ हजार ग्रामपंचायती शिंदे शिवसेनेच्या ताब्यात असतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील अडीच वर्षे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या, अशी मागणी करत आहेत. वास्तविक पाहता त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका पुन्हा एकदा आमदार बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आहे. त्यांचे मागील अडीच वर्षांतील वागणे काँग्रेसधार्जिणे आहे. भविष्यात ते ओवेसींसोबतही युती करतील, अशी बोचरी टीकाही त्‍यांनी या वेळी केली.

हेही वाचा : 

Back to top button