भंडारा : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून | पुढारी

भंडारा : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने काकाला केलेल्या मारहाणीत काकाचा रविवारी (दि.४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी आरोपी आनंद नागेश्वर वासनिक (वय ३४, रा. सालई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. कैलाश श्रीराम वासनिक (वय ५०, रा. सालई) असे खून करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, साकोली तालुक्यातील सालई येथील कैलास श्रीराम वासनिक व आनंद नागेश्वर वासनिक यांची घराजवळ एक एकर शेती आहे. काका कैलासची अर्धा एकर शेती पुतण्या आनंदने कंत्राटाने घेतली होती. ठेक्याची तीन हजार रुपयाची रक्कम आनंदने काका कैलासला दिली होती. मात्र, काका कैलास वारंवार आनंदला ‘माझी शेती यापुढे करायची नाही’ व व्यवहार झाल्यानंतरही वादविवाद घालून शिवीगाळ करायचा.

आनंद काकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होता. १९ नोव्हेंबर रोजी शेतात काम करीत असताना आनंदच्या आईला व आनंदला काका कैलासने शिवीगाळ केली व शेती करण्यावरुन वाद घातला. त्याकडे आनंदने दुर्लक्ष केले व घरी गेला असता घरी सुद्धा काका कैलासने शिवीगाळ करून वाद वाढविला. या वादामध्ये काका कैलासने हातात काठी घेऊन आनंदला मारहाण केली. तिच काठी आनंदने हिसकून प्रतिकार करीत काकाला झोडपले. यामध्ये काका कैलासच्या डोक्यावर जबर मार लागला. जखमी अवस्थेत काकाला घेऊन रूग्णालयात दाखल करण्यात आले. कैलासच्या डोक्यावर जबर मार असल्याने त्याला नागपूर नेण्याच्या सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला. आनंदने काका कैलासला नागपूर मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

काका कैलास हा झाडावरून पडल्याचे कारण सांगून आनंदने अनेक ठिकाणी उपचार केले होते. याविषयी पोलिसांना कळविण्यात आले नव्हते. गंभीर जखमी काकाची तब्येत जास्त बिघडत असल्याने व बेशुद्ध अवस्थेत असल्याने २४ नोव्हेंबर रोजी पत्नी जयमाला कैलाश वासनिक हिने पोलीस स्टेशन गाठून तक्रार केल्याने पोलिसांनी आरोपी आनंद वासनिक विरोधात गुन्हा दाखल केला होता. ४ डिसेंबर रोजी कैलाश वासनिक याचा नागपूर येथे मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पुतण्या आनंद नागेश्वर वासनिक याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमक्ष उपस्थित केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय खोकले यांनी दिली. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार चांदेवार, गुरव करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button