नागपूर; पुढारी वृत्तसेवा : 15 वर्षे झालेली खासगी, सरकारी वाहने यापुढे भंगारात जातील. स्क्रॅप युनिट्स वाढल्याने रोजगार वाढेल. यापुढे फ्लेक्स इंजिनच्या किंवा इलेक्ट्रिक इंजिनवर चालणाऱ्याच गाड्या खरेदी करा. पऱ्हाटीपासून तयार केलेल्या सीएनजीवर शेतकऱ्यांची वाहने चालतील. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. इथेनॉलचे पंप टाकायचे आहेत. विदर्भ पेट्रोल, डिझेल मुक्त करायचा आहे, असा विश्वास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
अमरावती रोडवरील दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर आयोजित अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गडकरी म्हणाले कालच मी एका फाईलवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदींनी मला यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. पंधरा वर्ष पूर्ण केलेले ट्रक, बसगाड्या, चारचाकी, दुचाकी राज्यांनीही भंगारात काढाव्या, अशी यात अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अॅग्रो व्हिजनमुळे शेतकऱ्यांचे जीवन बदलल्याचे सांगितले. नितीन गडकरी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. नितीन गडकरींनी अॅग्रो व्हिजन विदर्भापुरते मर्यादित न ठेवता मध्यप्रदेशातही आयोजित करावे. तिथे सरकार मदत करेल. शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याची ताकद या कृषी प्रदर्शनात आहे, यावर त्यांनी भर दिला.