Kadaknath Scam : महारयत कंपनीच्या संचालकाला अटक | पुढारी

Kadaknath Scam : महारयत कंपनीच्या संचालकाला अटक

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांची कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुपयांनी फसवणूक (Kadaknath Scam) केल्याचा प्रकार २ वर्षापूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी नागपूर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महारयत अॅग्रो इंडिया कंपनीचा संचालक सुधीर मोहिते याला अटक केली आहे. त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यभरात या कंपनीने 1500 हून अधिक शेतकऱ्यांना 500 कोटींहून अधिक रूपयांचा चुना लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सुमारे 2 वर्षांपूर्वी मे 2020 मध्ये बजाजनगर पोलीस ठाण्यात महारयत अॅग्रो कंपनीचे (Kadaknath Scam) संचालक सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, हनुमंत जगदाळे आणि इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. कडकनाथ प्रजातीच्या काळ्या रंगाच्या कोंबडीच्या चिकनला मध्य भारतात विशेषत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठी मागणी आहे. 900 रुपये प्रति किलो असा चिकनच्या विक्रीचा दावा केला जात होता. यातून मोठे उत्पन्न मिळवून देण्याच्या आमिषाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. मात्र, गुंतवणूकदार शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसेही परत दिले नाहीत.

अधिक पैशाच्या मोहात अडकून शहरातील 111 शेतकऱ्यांनी या कंपनीत एकूण 1.64 कोटी रुपये गुंतविले. आरोपींनी पैसे घेऊन व्यवसाय न सुरू करता फसवणूक केली. या प्रकरणी शेतकऱ्यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. याच धर्तीवर सांगली, पुणे, पालघर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही कंपनीने जाळे पसरवून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रार नोंदविण्यात आल्या होत्या.

दरम्यान, कोल्हापूरच्या एका प्रकरणात आरोपी कारागृहात बंद होते. हे प्रकरण प्रदीर्घ कालावधीपासून थंड बस्त्यातच होते. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने सुधीर मोहितेला कोल्हापूरच्या तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महारयत कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असेल. तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button