नागपूर : शाळेत आरोग्य शिबिरादरम्यान युवा डॉक्टरचे विद्यार्थिनिशी गैरवर्तन, पोलिसात तक्रार दाखल | पुढारी

नागपूर : शाळेत आरोग्य शिबिरादरम्यान युवा डॉक्टरचे विद्यार्थिनिशी गैरवर्तन, पोलिसात तक्रार दाखल

नागपूर;पुढारी वृत्तसेवा : शहरातील पारडी परिसरातील एका शाळेत विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी आयोजित आरोग्य शिबीरात एका युवा डॉक्टरने काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त पालकांनी डॉक्टराविरोधात पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पारडी परिसरातील एका शाळेत बुधवारी हे शिबिर घेण्यात आले. तपासणीनंतर काही विद्यार्थिंनी शिबीरावेळी झालेल्या प्रकाराबाबत शाळेच्या पटांगणात कुजबूज करीत असल्याचे ऐकले. त्यानंतर एका शिक्षिकेने आणि काही पालकांनी विद्यार्थिंनींना विश्वासात घेत, विचारपूस केली. यानंतर डॉक्टरने केलेल्या गैरप्रकाराची वाच्यता झाली. त्यामुळे शाळेतील काही पालक संतप्त झाले. त्यांनी पारडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नुकतीच ब्रेक फेल झाल्याने स्कुलबसने विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना घडल्याने चिंतेत असलेल्या पालकांना आता शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसुद्धा असुरक्षित असल्याची भीती बळावली आहे.

शिक्षकांच्या हजेरीत हे वैद्यकीय शिबिर होत असल्याने विद्यार्थिनीही बिनधास्त होत्या. मात्र, डॉक्टरच्या मनात काय चाललंय याची कल्पना त्यांच्या मनात नव्हती. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल ठेवलेल्या या विद्यार्थिनींना प्रारंभी तपासणी करीत असताना डॉक्टर चुकीचे वागत असल्याची शंका आली. मात्र, आपण चुकीचा विचार करीत असल्याचे समजून त्या गप्प राहिल्या अखेर ही कुजबूज शिक्षिकेच्या कानापर्यंत पोहोचली. त्यांनी पालकांसोबत चर्चा केली.

पालकांनीही विद्यार्थिनींसोबत बोलून खात्री करून घेतली. त्यानंतरच पालक एकत्रितपणे ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे अप्पर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी देखील पारडी ठाण्यात पोहचले. डॉक्टरांवरील आरोप प्रकरणी शहानिशा करण्यात येत असून योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

Back to top button