नागपूर शहराभोवती वाघाचा वावर; उपनगरात भीतीचे सावट | पुढारी

नागपूर शहराभोवती वाघाचा वावर; उपनगरात भीतीचे सावट

नागपूर; वृत्तसेवा : गेल्या महिन्याभरापासून नागपूर शहराच्या सीमेवर धुमाकूळ घालणारा वाघ आता हळूहळू शहराच्या दिशेने कूच करीत असून रोज गाय, बैल लक्ष्य करीत असल्याने दहशत वाढली आहे. हा मोठा पट्टेदार वाघ असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असून बेसा परिसरात रात्रीच्या वेळी ये- जा करणाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

रविवारी पेवठा गावात वाघाने शिरकाव केला. शेतात बांधून ठेवलेल्या बैलाला वाघाने ठार मारले. पेवठा नागपूरपासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर आहे. शनिवारी रात्री तो धामणाजवळ आढळला. हुडकेश्वर, वेळाहरी या वाढत्या नागरी वस्त्यांमध्ये यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे रोज हा वाघ रात्रीच्या वेळी आपला मुक्काम हलवित असून, या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला तातडीने हालचाली कराव्या लागणार आहेत. यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी वनविभागावर दडपण वाढवित आहेत. सध्या या वाघामुळे आसपासच्या गावांमध्ये दहशतीचे निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी गावकरी रस्त्यांवरून जाण्यासही घाबरत आहेत. पोलिसांकडून वनविभागाला सर्व माहिती देण्यात आली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करण्यासह वाघाला पडकून इतरत्र हलविण्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.

वाघाचा महिन्याभरापासून वावर

शहरालगत असलेल्या 8 ते 10 किमी अंतरावरील गावात मागील 1 महिन्यापासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावराचे बळी घेतले आहे. बरीच जनावरे गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. रोजच काही ठिकाणी अशा घटना घडत आहेत. रविवारी परोडा ते रूई मार्गावर गावालगतच्या खासगी शाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौकीदाराला पट्टेदार वाघ दिसला.

रविवारी सकाळी पेवठा ते वेळाहरी रोडवरील एका शेतकऱ्याला पिल्लासह वाघ दिसला. तर आशिष मेश्राम यांच्या शेतात वाघाने एका बैलाला ठार मारले. त्यांच्या शेतात 2 बैल, 1 गाय, वासरू बांधून होते. त्यापैकी एका बैलाची शिकार करून वाघाने त्याला शेताबाहेर ओढत नेले.

वाघाच्या भीतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे जगणेच कठीण झाले आहे. आधीच पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता वाघाच्या भीतीने शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण होऊन बसले आहे. शेतातील पिके जनावरांच्या घशात जात आहेत. अशात शेतकरी कसा जगेल. शासनाने वाघाला पकडून ग्रामस्थांवरील भीती कायमची दूर करावी.
-सचिन इंगळे, सरपंच, वेळाहरी.

Back to top button