गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | पुढारी

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जंगलात गुरे चारावयास गेलेल्या शेतकऱ्यासह एका गायीला वाघाने ठार केले. ही घटना मंगळवारी (ता.८) संध्याकाळी कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत मुरमुरी गावानजीकच्या जंगलात घडली. दशरथ कुनघाडकर (वय ६७) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, दशरथ कुनघाडकर हे मंगळवारी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. संध्याकाळी गुरे परत आली. परंतु कुनघाडकर परत आले नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी रात्री जंगलात शोध घेतला. मात्र, कुनघाडकर दिसून आले नाही. त्यानंतर बुधवारी (ता.९) पुन्हा गावकरी जंगलात गेले असता प्रथम त्यांना एक गाय मृतावस्थेत आढळली. पुढे काही अंतरावरच दशरथ कुनघाडकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी राहुल तांबरे यांनी त्यांचे सहकारी आणि पोलिसांसह घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला. कुनघाडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती ठार होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button