चंद्रपूर : …तर महालगावचे शेतकरी अतिवृष्‍टीची तुटपूंजी मदत शासनाला परत करणार | पुढारी

चंद्रपूर : ...तर महालगावचे शेतकरी अतिवृष्‍टीची तुटपूंजी मदत शासनाला परत करणार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील महालगाव काळू येथील शेत शिवारात जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शासनाने घोषित केलेल्या मदतीपेक्षाही अत्यल्प मदत येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आल्याने शेतकऱ्यांनी शासनाने दिलेली मदत परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत शेकडो शेतकऱ्यांनी, ग्रामसेवकाने कार्यालयातच बसून नुकसानीचे पंचनामे केले, त्यामुळे अत्यल्प मदत मिळाल्याने आम्हा शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या नुकसानीचे नव्याने पंचनामे करून वाढीव मदत देण्याची मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

चिमूर तालुक्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील माहलगाव (काळू) गावामध्ये ढग फुटीसारखी स्थिती निर्माण होवून नदीला आलेल्‍या महापूराने हाहा:कार माजविला होता. शेतकऱ्यांच्या अन्नधान्याची नासाडी होऊन, परिसरातील संपूर्ण शेतीपिके खरडून गेली होती. अशाप्रकारची भयावह स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी पूर स्थितीत या गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले होते. तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळावी, म्हणून आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने सर्वे करून पंनामे करण्यात केले. महालगाव (काळू) येथील ग्रामसेवक रूपचंद धनविजय यांनी कार्यालयातच बसून शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे केल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत प्राप्त झाल्याचा आरोप शेतक-यांनी केला.

शेकडों शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामूळे तुटपूंजी मदत परत करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. कार्यालयात बसून पंचनामे करणाऱ्या दोषी ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत शासकीय स्तरावर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चिमूर उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

पत्रकार परिषदेला महालगाव (काळू) गरडापारच्या सरपंच अनुसया नन्नावरे, उपसरपंच रामराव नन्नावरे, सदस्य सज्ञान नगराळे, महत्‍मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गजानन मसराम, पोलीस पाटील मिलिंद नगराळे, माजी सरपंच खवसे, बंडू बोरकर, संजय जूमडे, चक जांभुळ विहीराचे माजी सरपंच चंद्रशेखर दडमल, प्रेमदास बोरकर व गरडापार, चक जांभूळविहीरा, डोंगरगावचे असंख्य शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :  

Back to top button