दम द्याल तर घरात घुसून मारू .. रवी राणांचा बच्चू कडू यांना इशारा | पुढारी

दम द्याल तर घरात घुसून मारू .. रवी राणांचा बच्चू कडू यांना इशारा

अमरावती; पुढारी वृत्तसेवा :  माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत मेळावा घेत खोके आणि किराणा वाटपावरून झालेला वाद संपल्याचे घोषित केले. मात्र, रवी राणांची पहिली वेळ आहे, माफ केले, असा इशारा कडू यांनी दिला होता. यावर आमदार रवी राणा यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना, दम दिला तर घरात घुसून मारू, असा इशारा दिला आहे.

आ. राणा यांच्या वक्तव्याला बच्चू कडू यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. रवी राणा तलवार घेऊन आले तर ते सांगतील त्या चौकात येईन, त्यांचे वार छातीवर झेलेन, असा इशारा कडू यांनी दिला. त्यामुळे खोके आणि किराणा वाटपावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या दरम्यान सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसून येत नाही.

बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय : राणा

हा वाद आता मिटला आहे; पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू दम देत असतील, तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सक्षम आहे, असा इशारा राणा यांनी दिला. प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर दहादा माघार घायला तयार आहे; पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी तलवार घेऊन यावे : बच्चू कडू

त्यांनी तलवार घेऊन यावे. मी पाच, सहा, सात तारखेला कुरळ पूर्णा येथे आहे. त्यांना लांब वाटत असेल, तर चौकात येतो. तुम्ही तलवार घेऊन या, असे आवाहन आ. कडू यांनी दिले आहे. त्यांनी तलवार घेऊन यावे मी फुले घेऊन येणार आणि त्यांच्या तलवारीचे वार बच्चू कडू छातीवर झेलायला तयार आहे. मला वाद वाढवायचा नाही, बरेच काम आहे. शांततेने सगळे नाही झाले तर मीही तयार आहे, असे प्रत्युत्तर राणा यांना दिले.

Back to top button