नागपूर : आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राबाहेर | पुढारी

नागपूर : आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राबाहेर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांत आधी महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक मोठे प्रकल्प ऐनवेळी इतर राज्यांत गेले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. नंतर नागपुरातील मिहान येथे होऊ घातलेला हवाई दलासाठीचा टाटा-एअरबसचा वाहतूक विमाननिर्मितीचा प्रकल्पही गुजरातमधील बडोद्याला गेला. आता नागपूरमध्ये होणार असलेला आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी ‘सॅफ्रन’ आपला विमान इंजिन दुरुस्ती- देखभालीचा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये सुरू करणार होती. आता हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हे घडल्याचे सांगण्यात येते.

सॅफ्रन कंपनी विमान आणि रॉकेटचे इंजिन बनवण्याच्या क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. कंपनीतर्फे नागपुरात वर्षाला 250 विमान इंजिन दुरुस्ती नियोजित होती. त्यासाठी कंपनीकडून 1 हजार 115 कोटी रुपयांच्या प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. सॅफ्रन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

आपल्याकडे कौशल्य असलेले मनुष्यबळ उपलब्ध असताना प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. हे केवळ राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमुळे घडत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही, महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते बघून दु:ख होत असल्याचे म्हटले आहे.

‘या’ कारणांनी गेला प्रकल्प

मिहानमध्ये कंपनीला हवी तशी जमीन उपलब्ध झाली नाही. नागपूर किंवा हैदराबाद असे दोन पर्याय कंपनीसमोर होते.
नागपुरात जमीन मिळण्यात उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने हैदराबादचा पर्याय निवडल्याचे सांगण्यात येते.
प्रशासकीय दिरंगाईमुळेही हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती आहे. कंपनीने अधिकृतपणे कुठलेही निवेदन अद्याप जारी केलेले नाही.

Back to top button