नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी सज्ज | पुढारी

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी सज्ज

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात दीक्षाभूमी येथे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंचशील ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर या सोहळ्याचा अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. दीक्षाभूमीवरील बौद्ध स्तूपाच्या मागच्या बाजूच्या मैदानात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना ही करण्यात आली. तिथीनुसार उद्या (दि.५) हा दिवस साजरा होणार आहे. पंचशील ध्वजाच्या पाच रंगांमध्ये तथागत गौतम बुद्धांचे विचार व्यक्त होतात. त्यामुळेच या ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला हजेरी लावणार

उद्याच देशभरात दसराही साजरा केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे अशा दोन वेगवेगळ्या गटांचे दसरा मेळावे होणार असल्याने राजकारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याच प्रश्नाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काही घटक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी या गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असेल. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कोणता दसरा मेळावा अटेन्ट करण्यास इच्छुक आहात, असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, मी नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लाईव्ह प्रक्षेपण

दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या थेट प्रक्षेपण इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबर २०२२ आणि ५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६ पासून खालील दिलेल्या लिंकवर हा सोहळा बघता येणार आहे.

http://live.ivb7.com/rajvideo.aspx

महापालिकेने केली चोख व्यवस्था

देशभरातून लाखो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येतात. यानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना मनपातर्फे योग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहील. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल.

मनपा उपयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, नागपूर महापालिकेचे नियंत्रण कक्ष पुढील तीन दिवस २४ तास कार्यरत असणार आहे. यात घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. साफसफाईसाठी प्रत्येक पाळीत २० कर्मचारी तैनात असणार आहेत. रस्त्यावर पडलेला कचरा, साफसफाईतील कचरा चारही रस्त्यावर असलेल्या २०० ड्रममध्ये साठवून, ड्रममधील कचरा नेण्याकरता करण्याकरिता २० लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जलप्रदाय विभागातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे सार्वजनिक भोजनदान स्थळी असलेल्या पिण्याच्या पाण्याचे ड्रम टँकरच्या माध्यमातून पाणी भरून ठेवण्यात आले आहे.

रहाटे कॉलनी चौक ते लक्ष्मीनगर चौक -४० नळ, दीक्षाभूमी चौक ते काछीपुरा चौक ५० नळ, आयटीआय परिसरात ४० नळ लावण्यात आले आहेत. आकस्मिक प्रसंगी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता मनपा शाळेत विद्युत दिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेद्वारे ९०० शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नीरी रोड, काछीपुरा चौक, रहाटे कॉलनी चौक, लक्ष्मीनगर चौक मोबाईल टॉयलेट तयार करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button