Murder : प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा | पुढारी

Murder : प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दागिने पळविण्याच्या उदेश्याने चोरांनी घरात प्रवेश केला आणि त्यांनी पतीला ठार (Murder) केले. घरातील दागिने पळविले, अशी तक्रार देणारी पत्नीच स्वत:च्या पतीची मारेकरी निघाली. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीला ठार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. मनोज रासेकर असे मृत पतीचे नाव असून तो स्थानिक बालाजी वॉर्डातील रहिवासी आहे. खूनाची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री एक वाजताच्या सुमाराला घडली होती.

चंद्रपूर शहरातील बालाजी वार्डातील निवासी मनोज रासेकर याचा गुरूवारच्या रात्री चोरट्यांनी घरातील दागिने पळविण्याच्या उदेश्याने घरात प्रवेश करून दागिने पळविले आणि पती मनोज रासेकरची हत्या (Murder) केल्याची तक्रार पत्नी सुनीता हिने पोलिसात केली होती. या घटनेबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या या हत्याकांडाने पोलिस यंत्रणा हादरली. दागिने पळवून नेणाऱ्या आणि हत्या करणा-या आरोपींचा शोध सुरू झाला.

सर्वप्रथम सायबर सेलच्या माध्यमातून मृत मनोजची पत्ती सुनीता हिची विचारपूस करून चौकशी करण्यात आली. शिवाय तिच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सुनीता हिचे तिच्या मुलीच्या शाळेतील शिक्षक स्वप्नील गावंडे (वय 34) याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात मनोज हा अडसर ठरत होता. त्याचा काटा काढण्यासाठी मनोजच्या हत्येचा कट प्रियकर स्वप्नील गावंडे व पत्नी सुनीता या दोघांनी रचला. गत पंधरा दिवसांपासून पती आजारी आहे, हे बघून सुनीताने आणि स्वप्नीलने हत्येचा कट रचला. (Murder)

आजारपणातच मनोजचा मृत्यू झाला, असा देखावा निर्माण करण्याचा दोघांना उद्देश होता. घटनेच्या दिवशी रात्री सुनीताने प्रियकरला घरी बोलावून घेतले. गाढ झोपते असलेल्या मनोजच्या तोंडावर उशी दाबून त्याला ठार मारले. या झटापटी मनोजची आई जागी झाली. तिला सुद्धा या दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. सुनीताने घरात चोर घुसल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले. मृतकाच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि मनोजला दिली. त्यानंतर शांतपणे मारेकरी घराबाहेर पडला, असे तपासात निष्पन्न झाले. (Murder)

या घटनेत शहर पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्याने पत्नी सुनीतानेच स्वतःच्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकर स्वप्निलची मदत घेवून हत्या केल्याचे निष्पण झाले. प्रियकर स्वप्नील आणि पत्नी सुनिताला पतीच्या हत्येप्रकरणात अटक केली आहे.

Back to top button