
अकोला; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकार स्वतःच कायदा व सुव्यवस्था बिघडवत असून सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. वाशीम येथील काँग्रेस मेळाव्याला जाण्यासाठी ते अकोल्यात आले होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
स्थानिक विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, दरवर्षी शिवाजी पार्कवर दस-याच्या दिवशी मेळावा होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून या मेळाव्याची परंपरा सुरू झाली आहे. या परंपरेला काँग्रेस त्यावेळीपासून सहकार्य करत आली आहे. पण आता जे नवीन हिंदूहृदय सम्राट झालेले आहेत, ते सध्या हिंदुच्या परंपरेला विरोध करताना दिसत आहेत, असा थेट टोला नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. (Nana Patole)
राज्यात लम्पी नावाचा रोग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. सत्ताधाऱ्यांनी हिंदूंच्या नावाचा गाजावाजा सुरू केला आहे. गाई म्हणजे महाराष्ट्रात आई आहे, केरळ आणि गोव्यात खाई आहे, असा टोला नाना पटोले यांनी लागवला आहे. भारत जोडो ही यात्रा देशासाठी आहे, राहुल गांधी तिरंग्यासाठी लढत आहेत. भाजपकडून सातत्याने तिरंग्याचा अपमान होत आहे, देशाचं संविधान संपवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. यावेळी जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा