अकोला, पुढारी वृत्तसेवा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी कालावधीत तब्बल सहा महिने गैरहजर राहिल्याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती 'जीएमसी'कडून देण्यात आली आहे. ही कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते.
याप्रकरणी शुक्रवारी नागपूरहून एक चौकशी समिती शुक्रवारी अकोल्यात दाखल झाली होती. एमबीबीएस दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून नियोजित प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र 'जीएमसी'कडून देण्यात येते. मात्र तीन विद्यार्थी प्रशिक्षण कालावधीत सहा महिने गैरहजर असल्याने त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊ नये, असे पत्र काही विद्यार्थ्यांकडून अधिष्ठातांना देण्यात आले होते.
या प्रकरणात आठ डॉक्टर आणि प्राध्यापकांचा सहभाग असलेली चौकशी समिती नेमून त्या तीन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित विद्यार्थी दोषी आढळल्याने त्यांना रिपीट केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही, असा निष्कर्ष समितीने दिला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.
हेही वाचा