सचिन तेंडुलकर वाघ पाहण्यासाठी ताडोबात दाखल! | पुढारी

सचिन तेंडुलकर वाघ पाहण्यासाठी ताडोबात दाखल!

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

व्याघ्र पर्यटनासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सात महिन्यानंतर पुन्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी डॉक्टर अंजलीसह आज शनिवारी (४ सप्टेंबर ) दुपारच्या सुमारास ताडोबात दाखल आला आहे. त्यांच्या सोबत कुटुंबातील अन्य तिघांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मागील जानेवारी महिन्यामध्ये सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबियांसमवेत तब्बल चार दिवस ताडोबात मुक्कामी होते.

देशभरातील पर्यटकांना ताडोबा अभयारण्यात वाघांचे हमखास दर्शन होत असल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळेच ताडोबात व्याघ्र पर्यटनाकरिता राजकीय, सिनेसृष्टी असो वा खेळातील सेलिब्रेटींची हजेरी लागत असते.

आज शनिवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी डाॅक्टर अंजलीसह दुपारच्या सुमारास नागपूर येथून ताडोबात दाखल आला आहे. त्याच्या समवेत कुटूंबातील अन्य तिघांचा समावेश आहे. ताडोबात दूपारी आगमन झाल्यानंतर चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्ट येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारी साडेतीच्या सुमारास मदनापूर गेट वरून त्यांनी जंगलसफारीकरीता ताडोबात प्रयाण केले आहे.

विशेष म्हणजे कोरोना काळ असल्याकारणाने त्यांच्या ताडोबातील आगमणाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. दुपारपासून साडेतीन ते साडेसहा पर्यंतच्या कालावधीत त्यांना पर्यटनाचा आनंद व्याघ्र दर्शनामुळे द्विगुणित करता येणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किती दिवस ताडोबात मुक्कामी राहणार आहेत हे अधिकृतपणे समजले नाही.

सात महिन्यापूर्वी जानेवारी महिन्याच्या अखेरीस सचिन हा आपल्या कुटुंबातील सदस्यांसह चार दिवसाच्या ताडोबा मुक्कामी आला होता. या दरम्यान चार दिवसाच्या जंगल सफारीत वाघ, वाघीणींचे दर्शन तर झालेच पंरतु ताडोबाची शान असलेल्या झरणी, छोटी तारा, झुनाबाईचे त्यांना दर्शन घेता आले. या वाघ वाघिणींनी त्यांना विशेष भूरळ घातली.

सात महिन्यानंतर ही भूरळ कायम असल्याने पुन्हा आज शनिवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे पत्नी डॉक्टर अंजली आणि परिवारातील अन्य तिन सदस्यांसह ताडोबा दाखल झाले आहेत. आज मदनापूर प्रवेशद्वारातून त्यांनी पहिली सफारी सूरू केली आहे. मागील वेळेस या प्रवेशद्वारातून बच्छडे, आणि वाघासह झुणाबाईला सचिन यांना जवळून न्याहाळता आले हे विशेष!

Back to top button