चंद्रपूर: कोंबड्या खाण्यास चटावलेला बिबट्या जेरबंद | पुढारी

चंद्रपूर: कोंबड्या खाण्यास चटावलेला बिबट्या जेरबंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: कोंबड्या खाण्यास चटावलेला अडीच वर्षाचा बिबट्या आज ( दि.१४) पहाटे साडेचारच्या सुमारास कोंबड्यांच्या खुराड्यात घुसला आणि त्या ठिकाणी अडकला. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू करून त्या बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले आहे. भद्रावती शहरातील खापरी वार्ड येथील साईनगर येथे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली होती.

भद्रावती शहरातील साईनगरातील खापरी वार्डात मागील काही दिवसांपासून कोंबड्या खाण्यास बिबट्या चटावलेला होता. त्यामुळे नागरिकांमध्येही चांगली दहशत निर्माण झालेली होती. आज पहाटे साडेचारच्या सुमारास खापरी वार्डातील निरंजन चक्रवती यांच्या घरामध्ये तो घुसला. कोंबड्या ठेवलेल्या खुराड्यांमध्ये घुसून त्याने कोंबड्या खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर बिबट्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता तो अडकला. सकाळी चक्रवर्ती कुटुंबातील काही सदस्य बाहेर निघाले असता बिबट खुराड्यात अडकलेला आढळून आला.

तब्बल साडे ५ तासानंतर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. हा बिबट्या अडीच वर्षीय असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे, इको-प्रोचे बंडू धोतरे व त्यांची चमू, सार्डचे अनुप येरणे व त्यांची चमू, आरआरआर व आरआरटी या टीमने रिस्क्यू ऑपरेशन करत तब्बल साडे ५ तासानंतर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केले. पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या कामी रविकांत खोब्रागडे, भद्रावती वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहायक विकास शिंदे, बीट वनसंरक्षक धनराज गेडाम, वनरक्षक, वन कर्मचारी, वन मजूर सार्डचे इम्रान खान, अमोल कुचेकर, सोनू कूचेकर, प्रणय पतरांगे, पंकज कूचेकर, इको-प्रोचे संदीप जीवने, अमोल दौलतकर, दीपक कावठी आदींचे सहकार्य लाभले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button