यवतमाळ : सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या | पुढारी

यवतमाळ : सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

खाजगी सावकाराचा तगादा असह्य झाल्याने एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यवतमाळ शहरातील पारिजात सोसायटीत नुकतीच ही घटना घडली.

तुषार माणिकराव साठवणे (वय ४०) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. तुषार यांचा मॉड्यूलर फर्निचरचा व्यवसाय होता.

तुषार साठवणे यांनी वडगाव ग्रामपंचायतजवळ दुकान सुरू केले होते. लॉकडाऊन काळात त्यांचे दुकान पूर्णता बंद होते. व्यवसायही चालत नव्हता.

त्यामुळे अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडताना तुषार साठवणे यांनी सिंघानियानगरातील सावकार ताटी पामुलवार यांच्याकडून दोन लाखांचे कर्ज घेतले.

व्यवसाय सुरळीत झाल्यावर या कर्जाची परतफेड करू असेही सांगण्यात आले. मात्र, कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून सततचा तगादा सुरू होता. वारंवार अपमानजनक वागणूक मिळत होती. सावकार सतत फोन करीत होता.

दुसरीकडे व्यवसायात गती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. सावकारी जाचाला कंटाळून अखेर तुषार साठवणे यांनी २४ ऑगस्टला रात्री आठ वाजता फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुषार यांची पत्नी पूनम साठवणे यांनी २९ ऑगस्टला अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भरून सावकार ताटी पामुलवार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button