
भंडारा, पुढारी वृत्तसेवा : अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोसरा येथे दोन कुटुंबात असलेला जागेचा वाद सोडविण्यासाठी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी आले असता दोघांनी पती-पत्नीवर हल्ला केला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना पतीचा मृत्यू झाला. सुनील हटवार (४४) रा. कोसरा असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी आराेपी पंढरी श्रावण भूरले (६१) आणि गुणवंता उर्फ राकेश पंढरी भूरले (२५ रा. कोसरा) या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हटवार आणि पंढरी भूरले यांच्यात घराच्या जागेवरुन वाद होता. ताे सोडविण्यासाठी तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गेले. त्यावेळी पंढरी भूरले याने सुनील हटवार यांना काठीने मारहाण केली. तर राकेशने सुनील यांच्या पत्नीच्या पायावर स्टीलची बादली मारुन जखमी केले. सुनील यांच्या डोक्यावर काठीने वार केले. तदोन्ही पती-पत्नीला खुर्ची फेकून मारुन जखमी केले. या घटनेत गंभीर जखमी झालेले सुनील हटवार यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुनील हटवार यांचा मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार सुनील यांची पत्नी संगीता हटवार यांनी अड्याळ पोलिस ठाण्यात केली आहे. पंढरी भूरले आणि राकेश भूरले या दाेघांना पाेलिसांनी अटक केलीआहे. न्यायालयाने पंढरी याला न्यायालयीन कोठडी तर राकेश याला २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा