नाशिक : बंद घर फोडून ३ लाख ५२ हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास | पुढारी

नाशिक : बंद घर फोडून ३ लाख ५२ हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास

देवळा, पुढारी वृत्तसेवा : सरस्वतीवाडी येथील शेळके वस्तीवर बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ८८ ग्रॅम सोने (३ लाख ५२ हजार रुपयांचे) चोरी केल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) समोर आली. कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी उठवला. या चोरीप्रकरणी देवळा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेळके वस्ती येथे वास्तव्यास असलेल्या गृहिणी मीनाक्षी रामराम शेळके या बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून ऐवज लंपास केला. यात सोन्याची चार तोळ्याची पोत, दीड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १५ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या असा एकूण सोन्याच्या ८८ ग्रॅम वजनाच्या ३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. ही चोरीची घटना १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान घडली.

याबाबत देवळा पोलीस ठाण्यात भां.द.वि कलम ४५७, ४५४, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलीस कर्मचारी चंद्रकांत निकम आदी करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button