मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार : उदय सामंत | पुढारी

मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार : उदय सामंत

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केली. येथील एका कार्यक्रमासाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा मुद्दा मांडला होता, असे सांगून सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेची ही मागणी होती. हे विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसांत समिती स्थापन करण्यात येईल. समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना अधिक वेग येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात ‘मराठी विद्यापीठ’ स्थापनेला वेग देण्यात येईल, असे सामंत म्हणाले.

महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने राज्यात मराठी विद्यापीठ स्थापन व्हावे ही मागणी लावून धरली होती. त्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांकडे पाठपुरावा केला. परिणामी अनेक पक्षांनी जाहीरनाम्यात मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मुद्द्याचा समावेश केला. आता ही मागणी पूर्ण होत असल्याने त्याचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली.

सामंत यांच्या उपस्थितीत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ती सामान्यांची भाषा व्हावी, यासाठी या संस्कृत विद्यापीठाची उपकेंद्रे रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे सुरू करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला. ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

Back to top button