अमरावती : बचावासाठी हल्लेखोरावर झाडलेली गोळी मुलीला लागली | पुढारी

अमरावती : बचावासाठी हल्लेखोरावर झाडलेली गोळी मुलीला लागली

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बचावासाठी हल्लेखोरावर झाडलेली गोळी एका 13 वर्षीय मुलीला लागल्याने ती गंभीर जखमी झाली. शहरातील भातकुली रोडवरील बाबा चौक परिसरात ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12) सायंकाळच्या सुमारास घडली. सदफ परविन नौशाद कुरेशी (13, रा. हैदरपूरा) असे जखमी मुलीचे नाव आहे. तलवार हल्ल्यात गोळीबार करणारा व्यक्ती जुबेर खान देखील जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस उपायुक्त एम.एम. मकानदार, नागपूरी गेट व गुन्हे शाखेच्या पोलिसांसह क्युआरटी पथकाचा ताफा घटनास्थळी पोहोचला.

बाबा चौक परिसरात राहणारे जुबेर खान यांचे चिकन सेन्टर आहे. दुकानामागेच त्याचे निवासस्थान आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तलवार घेऊन आलेल्या काही हल्लेखोरांनी जुबेर खान यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या हाणामारीत जुबेर खान यांना तलवार लागल्याने ते जखमी झाले. दरम्यान त्यांनी स्वता:च्या बचावासाठी हल्लेखोरांवर त्यांच्याजवळ असणा-या पिस्तुलमधून गोळ्या झाडल्या. त्याचवेळी आपल्या बहिणीसोबत शाळेतून घरी परत जाणारी सदफ परविन नौशाद कुरेशी हिच्या पायाच्या पोटरीवर ती गोळी लागली. ती गोळी आरपार निघून गेल्याने तिच्या पायाला गंभीर जखम झाली. काही नागरिकांनी सदफ परविनला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी सदफला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

काही नागरिकांनी जखमी सदफ परविनला तत्काळ ऑटोत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आला. या घटनेच्या माहितीवरून जखमीच्या कुटुंबीयांसह शेकडो नागरिकांनी रुग्णालय परिसर गाठला. नागरिकांची वाढती गर्दी पाहून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त घटनास्थळ आणि रुग्णालय परिसरात लावण्यात आला होता.

हल्लेखोरांचा शोध, सीसीटीव्हीची पाहणी

बाबा चौकाजवळील चारा बाजार परिसरात ही घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस उपायुक्त एम.एम. मकानदार, एसीपी पुनम पाटील, नागपूरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरु केला. पोलिसांनी परफेक्ट चिकन सेन्टरमधील सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

तपास सुरु

या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु असून, एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
एम.एम. मकानदार, पोलिस उपायुक्त.

Back to top button