चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती; नागभीड तालुक्यात पूल गेला वाहून | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती; नागभीड तालुक्यात पूल गेला वाहून

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : अतिवृष्टीने नदी नाल्यांना पूर आला असून धरणे तुडूंब भरून काही दिवसांपासून ओव्हर फ्लो झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 ते 36 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात चंद्रपूरमध्ये तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. नद्यांना पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही गावात घरात पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. तर नागभीड तालुक्यात ब्रिटीश कालीन घोडाझरी तलाव ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या आसपास परिसरात प्रचंड पूरस्थिती निर्माण होऊन अनेक मार्ग बंद झाले आहेत. शेतशिवार पाण्याखाली गेले आहेत. नव्याने तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पंधरवाड्यापूर्वीच संतंतधार पावसाने सर्वत्र पुराने हाहाकार माजविल्यानंतर शांत झालेला पाऊस पुन्हा रौद्ररूप धारण करून आला आहे. जिल्हयात 24 ते 36 तासापासून मुसळधार पावसाने बल्लारपूर,राजूरा, गोंडपिपरी, चंद्रपूर, घुग्घुस परिसर, भद्रावती, वरोरा, नागभीड तालुक्यात हाहाकार माजविला आहे. महिन्याभरात चंद्रपूरमध्ये तिसऱ्यांदा पूर आला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावात पाणी शिरले असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यां पुराच्या विळख्यात आहेत. वारंवार निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थीला नागरिक कंटाळले आहेत.

हवामान खात्याने चंद्रपूर जिल्हयात रेड अलर्ट घोषीत केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना अलर्ट करण्यात आले होते. तसेच मदत कार्यासाठी आपत्ती विभागाच्या चमू तैनात करण्यात आलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अप्पर वर्धा, लोअर वर्धा, गोसीखुर्द धरण आणि ईरई धरण धरण ओव्हरफ्लो धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. नद्या-नाल्याना पूर आले आहे. वर्धा, वैनगंगा आणि ईरई नदीला पूर आहे. धरणात पाणी वाढत असल्याने परिस्थिती बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. पुरामुळे डझनभर गावाचा चंद्रपूर शहराशी संपर्क तुटला आहे. वर्धा नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने वर्धाहून तेलंगणाकडे जाणारा मार्ग मागील 24 तासांपासून बंद आहे. बल्लारपूर आणि राजुरा शहराला जोडणारा पूल महिन्यातून तिसऱ्यांदा पाणीखाली गेला आहे. मार्ग बंद असल्याने रस्त्यांवर गाड्यांच्या रांगा लागल्या आहे. भद्रावती तालुक्यातील पळसगाव संपूर्ण पाण्याखाली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

नागभीड तालुक्यात पूरस्थिती;घोडाझरी ओव्हरफ्लो

मुसळधार पावसाने नागभीड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटीशकालीन घोडाझरी धरण मागील काही दिवसांपासून ओव्हर फ्लो झालेला आहे. मात्र दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने सांडव्यातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे या भागातून वाहणारे नाल्यांना पूर आला आहे. किटाळी (बोरमाळा) नाल्यावर पूर आल्याने किटाळी गावाचा संपर्क 24 तासापासून तुटला आहे. बाळापूर पारडी मार्गावर तीन महिण्यापूर्वीच तयार करण्यात आलेला पूल पूरामुळे वाहून गेला आहे. या पूलाबाबत काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी होत्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे कानाडोळा केल्याने पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या पारडी बाळापूर मार्गावरी वाहतूक बंद आहे. तळोधी वाढोणा मार्ग बंद झाला आहे. या मध्ये असणाऱ्या एका छोट्या नाल्याला पूर आहे. तळोधी बाळापूर मार्गही बंद झाला आहे. तळोधी जवळील नाल्याला महापूर आला आहे.

वरोरा तालुक्यात पूरस्थिती; अनेक गावांचा संपर्क तुटला

वरोरा तालुक्यातील आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पिके पाण्याखाली आल्याने शेतऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोर जावे लागत आहे. माजरी पळसगाव मार्गावरील नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे पळसगावचा संपर्क तुटला आहे. वरोरा माढेळी मार्गावरील पांझूर्णी जवळील नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. माढेळी ते वरोरा मार्ग दैवल नाल्याला पूर आल्याने बंद झाला आहे. चरूरखटी गावाचा संपर्क तुटला आहे. वरोरा ते शेगाव मार्गावरील चिमूरला जोडणाऱ्या बाम्हण नाल्याला पूर आला आहे. या ठिकाणचा निर्माणाधीन पूल वाहून गेला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तात्पूरती व्हाया टेमूर्डा मार्गे वाहतूक सुरू आहे. वरोरा वणी मार्गावरी वाहतून बंद आहे. एकोना परिसरात कोलमाईन्स खाणींमुळे निर्माण झालेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे दैवलनाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतून बंद आहे. या ढिगाऱ्यामुळे नाल्यातील प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होत आहे. पाटाळा नदीवरील पुलामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होत आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात वैनगंगेला महापूर

ब्रम्हपुरी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगेला पूर आल्याने नदीकाठावरील गावांना हायअर्लट इशारा देण्यात आलेला आहे. पिंपळगावात पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कारवाई करण्यात येत आहे. लाडज बेटाचे स्वरूप प्राप्त झाल्याने या गावाच संपर्क तुटला आहे. लाडज ते चिखलगाव नाल्याला पूर आला आहे. गांगलवाडी मार्गावर वैनंगंगेचे पाणी आल्याने या ठिकाणी नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. आवळगाव जाणारा मार्ग बंद झाला आहे. पारडगाव फाटा ते बेटाळा नाल्याला पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात घरांची पडझड होत आहे. मांगली गावात घर कोसळल्याने तीन शेळ्या आणि एक बोकड मृत्यूमुखी पडला आहे. नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोसीखुर्द मधून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

राजूरा, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यातही पुराने हाहाकार उडविल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आले आहेत.

Back to top button