ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मी इन्स्टंट कॉफी पीत नाही’ | पुढारी

ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मी इन्स्टंट कॉफी पीत नाही’

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंदद्वार भेटीवर ‘मी इन्स्टंट कॉफी पीत नाही’ अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपुरात आल्या असता त्या विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडा वेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही.

माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही.

सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं.

माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत.

त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही.’

भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत.

नारायण राणे यांनी अनिल परब यांना ईडीची धमकी दिली आहे, याकडे सुप्रिया सुळे  यांचे लक्ष वेधले असता ‘ईडीच्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करते.

२५ वर्षे सरकार चालेल

राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झालाय,’असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला.

ठाकरे-फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे, याकडे लक्ष वेधले असता ‘महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण २५ वर्षे या राज्याची सेवा करेल,’ असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर ‘प्रत्येकाला पक्ष वाढीचा अधिकार आहे’, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा: 

Back to top button