चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मुलासोबत शेतावर गेलेल्या ४९ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज ( दि. 8) ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार शेतशिवारात घडली. दुर्योधन जयराम ठाकरे (रा. शिवनी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली ) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील शेतकरी दुर्योधन ठाकरे यांची शेती ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथे आहे. आज दुर्योधन ठाकरे आपला मुलगा आशिष याच्यासोबत शेतावर गेले होते.शेताला लागूनच जंगल परिसर आहे. शेताची पहाणी केल्यानंतर मुलगा शेळीला चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला होता. दुर्योधन ठाकरे हे खाली फांद्या गोळा करीत होते. याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने दुर्योधन ठाकरे यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांना फरफटत जंगलांच्या दिशेने नेले. वडिलांवर वाघाने हल्ला केल्याचे दृश्य पाहून आशिष पुरता घाबरून गेला होता.
उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये ही घटना घडली. वाघाने फरफटत नेलेला मृतदेह दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत कोसंबी कक्ष क्रमांक 175 हद्दीमध्ये आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.चनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेने बेलगाम परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात शेतशिवार लागून आहे. याच परिसरात वाघाने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशद पसरली आहे.