बुलडाण्यात नीलगायींचा उच्छाद; शेतकऱ्यांच्या वनविभागाकडे तक्रारी वाढल्या | पुढारी

बुलडाण्यात नीलगायींचा उच्छाद; शेतकऱ्यांच्या वनविभागाकडे तक्रारी वाढल्या

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : बुलडाणा जिल्ह्यात सध्या रोही (नीलगाय) या वन्यप्राण्याने खरीपाची पिके फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. या रोहीच्या उच्छादामुळे शेतीक्षेत्राचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली आहे. आणि सोबत त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ही समस्या जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र दिसत आहे. याच दरम्यान सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

चार दिवसांपूर्वी अंचरवाडी परिसरातील काही गावांतील शेतकरी रोहींच्या उपद्रवावर काहीतरी उपाययोजना करून आमची पिके वाचवा अशी मागणी करत कार्यालयावर पोहोचले होते. या त्रासाला कंटाळून बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या कार्यालय प्रांगणात शेतकरी फाशी घेण्यासाठी हाती दोरखंड घेऊन आले होते. पण पोलीस व वन अधिकाऱ्यांनी त्यांच्यात हस्तक्षेप केला आणि शेतातील पीक नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देऊ असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना परत पाठविले होते. तर याच दरम्यान रोही (नीलगाय) प्राणी खरीपांच्या पिकांची नासाडी करीत असल्याच्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी वनविभागाकडे दररोज येत आहेत.

याच अनुषंगाने सोमवार (दि. १ ऑगस्ट) रोजी सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देऊळगावराजा येथे पंचायत समिती कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व काही शेतकरी उपस्थित होते.

रोही प्राण्यांच्या उपद्रवावर काही प्रतिबंधक उपाययोजना करून पिकांना संरक्षण व शेतक-यांना दिलासा देण्याबाबत आमदार शिंगणे यांनी अधिका-यांना काही उपाय करण्याचे सांगितले. त्यात रोही प्राण्यांची प्रजननक्षमता ही जास्त असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी त्यातील नरांची नसबंदी करण्याचा एक उपाय सुचविला गेला. तसेच रोहीग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, जंगलाला तारेचे कुंपन करा अशा काही सूचना वन अधिकाऱ्यांना केल्या. रोही प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आ. शिंगणे यांनी यावेळी शेतक-यांना दिले.

या बैठकीबाबत ‘पुढारी’ प्रतिनिधीने जिल्हा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सर्वच भागात रोहीं प्राण्यांचा उपद्रव आहे. त्यांची संख्या सांगता येणार नाही. पिकांच्या नुकसान भरपाईबाबत शेताचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला जाईल. रोही प्राण्यांच्या नसबंदीबाबत लोकप्रतिनिधींनी सुचना केली आहे. त्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शन व पशूसंवर्धन विभागाची सल्ला घेऊन विचार करू. असे उपवनसंरक्षक गजभिये यांनी सांगितले.

‘रोही प्राण्याची नसबंदी’ या विषयावर ‘पुढारी’ प्रतिनिधीने देशातील आघाडीचे अभयारण्य तथा व्याघ्र प्रकल्पातील तज्ज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी वन्य प्राण्यांची नसबंदी हा अतिशय अशक्य विषय असल्याचे सांगितले आहे. वन्यप्राण्यांची नसबंदी करणे कायदेशीरदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्याही सोपी गोष्ट नाही.

रोही प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नसबंदी सोडून अन्य उपायांकडे वळता येईल. रोहींना पकडून जंगलाकडे स्थलांतरित करणे. तारांचे सौरउर्जाचलित प्रतिबंधक कुंपन तयार करणे, वनविभागाकडून पिकांची नुकसान भरपाई मिळवणे हे उपाय शक्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी वनविभागाची जबाबदारी मात्र वाढलेली आहे.

या प्राण्याच्या चेहऱ्याची ठेवण ही गायीच्या चेहऱ्याशी साम्य दर्शवते. त्यामुळे त्याला नीलगाय हे नाव पडले असावे. वस्तूत: कुरंग हरिण कुळातील हा प्राणी आहे. उंची घोड्यासारखी पण शरिराची ठेवण घोड्यासारखी संतुलित नसते. पुढचे पाय उंच व मजबूत असतात. मागचे पाय त्यातुलनेत कमी उंच असतात. नराला छोटी शिंगे असून त्याचे वजन २०० ते २५० किलो असते. रोही (नीलगाय) प्राणी खुल्या व कोरड्या प्रदेशात राहतो. घनदाट जंगलात राहण्याकडे त्याचा कल नसतो. पाण्याशिवाय तो काही दिवस राहू शकतो. कायद्याने या प्राण्याच्या शिकारीला परवानगी दिलेली नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button