काँग्रेस नेत्यांचे नागपुरातील ईडी कार्यालयासमोर धरणे, केंद्राच्या दडपशाहीचा केला निषेध | पुढारी

काँग्रेस नेत्यांचे नागपुरातील ईडी कार्यालयासमोर धरणे, केंद्राच्या दडपशाहीचा केला निषेध

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी ) कार्यालयात चौकशीला बोलाविले होते. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत विरोधकांना नामोहरम करीत असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ गुरूवार २१ जुलै रोजी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला.

सिव्हिल लाईन येथील ईडी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी सोमवार १३ जून रोजीही नागपुरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले होते. जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, ईडी सरकार मुर्दाबाद, तानाशाही नही चलेगी अशी घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी लोखंडी कठडे तोडून जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

यापूर्वी सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीला बोलावण्यात आले होते. परंतु कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागून घेतली होती. देशाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध भ्याड कारस्थान रचले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले असल्याचा आरोप यावेळी बोलताना करण्यात आला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरिटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

Back to top button